मिरा-भाईंदर : शहरातील वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि मिरा-भाईंदर वसई-विरार शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १६ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीचे भाग, अनधिकृत अतिक्रमण तसेच पार्किंग व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबविणे, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका व पोलिसांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा, पोलिस आयुक्त निकेत कौशिक, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण, अशोक वीरकर, उपायुक्त स्वप्नील सावंत, अतिरिक्त शहर अभियंता दिपक खांबित यांच्यासह महापालिका अधिकारी आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते.