मिरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री; कारवाईसाठी नगरसेवक संजय थरथरे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

प्रमोद देठे – मिरा-भाईंदर शहरात अवैध गुटखा, चरस, गांजा, एम.डी. व झोंबी (ड्रग्ज) यांसारख्या अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक संजय वसंत थरथरे यांनी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर व झोपडपट्टी भागात खुलेआम अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याने तरुण पिढी धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालय परिसर, शाळा परिसर, मंदिर परिसर तसेच निर्जन वस्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा व अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेषतः सार्वजनिक ठिकाणे आणि रहिवासी भागातही अशा प्रकारची विक्री उघडपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत विविध लोकप्रतिनिधींनी संबंधित पोलीस ठाण्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असल्याचेही थरथरे यांनी नमूद केले आहे. शहरातील संशयित ठिकाणांची तात्काळ तपासणी करून अवैध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अमली पदार्थांच्या साठा व वितरण साखळीचा शोध घ्यावा, तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवून या प्रकारांना आळा घालावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर विषयाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांसह नगरसेवक संजय थरथरे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *