मिरा-भाईंदरमध्ये १८ एप्रिलला ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सव

वंचित बहुजन आघाडीचा सामाजिक परिवर्तनाचा एल्गार; नवयान महाजलसाने रंगणार संध्याकाळ

मिरा-भाईंदर : सामाजिक न्याय, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरा-भाईंदरमध्ये १८ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शहराध्यक्ष इक्बाल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा महोत्सव सामाजिक जागृतीचा नवा एल्गार ठरणार आहे.
महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम तसेच एससी-एसटी अ‍ॅक्ट, माहिती अधिकार कायदा आणि शैक्षणिक हक्कांबाबत विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
संध्याकाळच्या सत्रात दीपप्रज्वलन, संविधान उद्देशिकेचे वाचन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध कलाकार शीतल साठे आणि सचिन माळी यांचा ‘नवयान महाजलसा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे.
या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिवर्तनाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इक्बाल महाडिक यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *