मिरारोड(प्रमोद देठे) – लग्नाचे आमिष दाखवून नवऱ्याची फसवणूक करत त्याच्या घरातील सोन्या-चांदीसह रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दोन महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर ठिकाणीही अशाच प्रकारे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेवकुमार बांगांडी नाडर (वय ५३, रा. मिरारोड पूर्व) यांना लग्नासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे सांगून आरोपी महिलांनी संपर्क साधला. त्यानंतर फोटो दाखवून चर्चा करून विवाह ठरवण्यात आला. लग्न लावून देण्याच्या नावाखाली फिर्यादींकडून विविध बँक खात्यांद्वारे ४४,६५० रुपये घेतले.
त्यानंतर आरोपी महिलांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरातून सुमारे ४.६५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू चोरी करून फरार झाल्या. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी माहिती मिळवून महिला आरोपी नेहा अरुण झेंबेलवाल (वय २२, रा. अहमदनगर) व केसरिमल लक्ष्मीलाल रंका (वय ४५, रा. नाशिक) यांना ताब्यात घेत अटक केली. तपासात आरोपींनी अहमदनगर, जोधपूर, बोरीवली (मुंबई) व जळगाव येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलिसांनी ही कारवाई केली.