महाराष्ट्रातील तरुणाईने जबाबदारीने वागावे ! गड किल्ले जपा ,इतिहास जपा, हाच खरा शिवभक्तीचा मार्ग! फत्तेसिंह सावंत

महाड( प्रतिनिधी)

सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड किल्ला हा केवळ दगड-मातीचा किल्ला नाही, तर तो हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांचा, त्यागाचा आणि अभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि याच ठिकाणी त्यांची पवित्र समाधी आहे. त्यामुळे रायगड हा प्रत्येक शिवभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. त्यामुळे रायगडचे पावित्र्य जपण्याचे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केली आहे

किल्ले रायगडावरील मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्री वेडिंग शूटिंग बाबत झालेल्या घटनेबाबत बोलताना अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष सावंत म्हणाले की अलीकडे या पवित्र गडावर प्री-वेडिंग शूटिंग झाल्याची घटना समोर आली आणि मन हेलावून गेले. जिथे प्रत्येक पाऊल टाकताना इतिहासाची जाणीव ठेवावी लागते, तिथे अशा प्रकारे मनोरंजनासाठी, दिखाव्यासाठी केले जाणारे कृत्य अत्यंत वेदनादायी आणि असंवेदनशील आहे.

गड-किल्ले हे केवळ पर्यटनासाठी नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची, स्वाभिमानाची आणि संघर्षाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. येथे प्रत्येक दगडात मावळ्यांचे रक्त सांडले आहे, प्रत्येक भिंतीत स्वराज्याचा इतिहास कोरलेला आहे. अशा ठिकाणी शिस्त, आदर आणि भान ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
पुरातत्त्व विभागाची व समाधी स्थळाजवळील असणाऱ्या पोलिसांची भूमिका काय?

Archaeological Survey of India च्या नियमांनुसार परवानगीशिवाय अशा प्रकारचे छायाचित्रण करणे हा गुन्हा आहे. मग हा प्रकार घडला कसा? त्या वेळी प्रशासन आणि पोलीस काय करत होते? हे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे रायगड किल्ल्यावर झालेल्या प्री वेडिंग शूटिंग त्या घटनेनंतर या दोन प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात असून आता कारवाई कोणी कुणावर करायची असा प्रश्न सर्वसामान्य जनता राज्य शासनाला विचारत आहे केवळ निव्वळ सोपस्कार पार पाडून उपयोग नाही तर याबाबत तमाम किल्ल्यावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या भावनांचा यामागे आदर आहे त्यामुळे आता सरकार काय कारवाई करते असा प्रश्न रायगड किल्ल्यावर येणारे शिवभक्त राज्य शासनास विचारीत आहेत

याबाबत बोलताना प्रत्यक्ष सावंत म्हणाले की आजच्या तरुणाईने इतिहास समजून घेतला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आधुनिकतेच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अपमान करत आहोत का, याचा विचार करणे गरजेचे आहे.

गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, इतिहासाचा अभिमान बाळगा, पण त्याचा अवमान होऊ देऊ नका, अशा घटनांना वेळीच आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे

जर आज आपण शांत बसलो, तर उद्या अशा घटना वाढत जातील आणि आपल्या इतिहासाचा अपमान होत राहील. त्यामुळेच गरज आहे जागृतीची, सजगतेची आणि आवश्यक असेल तर कठोर आंदोलनाची. अशा स्पष्ट शब्दात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *