मीरा-भाईंदर : तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मीरा-भाईंदरकरांच्या दारी मेट्रो धावली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर (काशिगाव) या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या मेट्रो प्रकल्पामुळे मीरा-भाईंदर आणि मुंबईतील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, दररोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. याचवेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘स्मार्ट मेट्रो १’ या कॅशलेस कार्डचे अनावरण करण्यात आले. या कार्डमुळे तिकीटांच्या रांगांपासून सुटका होऊन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गायमुख ते दहिसर या मेट्रो १० प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या महिन्यातच प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.
संघर्षातून साकारले मेट्रोचे स्वप्न
२००९ मध्ये मीरा-भाईंदरला मेट्रो आणण्याचे दिलेले वचन पूर्ण झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भावूक झाले. “१५ वर्षांच्या संघर्षानंतर आज मीरा-भाईंदरकरांना मेट्रो मिळाली. हा विजय माझा नसून नागरिकांचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
अंधेरीपर्यंत प्रवास आता सुसाट
मेट्रो ७ आणि मेट्रो ९ च्या संयुक्त मार्गिकेमुळे गुंदवली ते काशिगाव असा १९.७९ किमी लांबीचा मार्ग सुरू झाला आहे.
पहिली गाडी : पहाटे ५.५०
शेवटची गाडी : रात्री ११.००
गर्दीच्या वेळी दर ५ ते ६ मिनिटांनी सेवा
या सुविधेमुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नागरिकांमध्ये उत्साह
२०१८ मध्ये मंजुरी, २०१९ मध्ये कामाची सुरुवात आणि एप्रिल २०२६ मध्ये पहिला टप्पा पूर्ण — या प्रवासानंतर अखेर मीरा-भाईंदरच्या विकासाला वेग मिळाला आहे. लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक, शिवसेना-भाजप पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, आमदार नरेंद्र मेहता, संजय उपाध्याय, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मीरा-भाईंदरच्या विकासाला आता ‘मेट्रोचा वेग’ मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.