मीरा-भाईंदर : गेल्या दीड दशकापासून प्रतीक्षेत असलेले मेट्रोचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर असून, आगामी एप्रिल महिन्यात मीरा-भाईंदरकरांना मेट्रो सेवेतून प्रवास करता येणार आहे. “प्रवासाला विलंब झाला तरी चालेल, पण सुरक्षेशी कोणतीही तडजोड मान्य नाही,” असा ठाम संदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
काशीगाव मेट्रो स्थानकाची त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करत आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष तसेच प्रवासी सुविधांची बारकाईने तपासणी केली. मेट्रो प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रेही प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
२००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले मेट्रोचे आश्वासन आता पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या प्रतीक्षेला यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुरक्षा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेमुळे उद्घाटनाला विलंब झाला होता, मात्र आता सर्व अडथळे दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेट्रो मार्गिकेमुळे दर तासाला सुमारे ४,५०० प्रवासी तर दिवसाला जवळपास ५० हजार प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे मीरा-भाईंदर परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रोचे भव्य लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.
“मी केवळ सुविधा देण्यावर भर देत नाही, तर त्या सुविधेत नागरिकांची सुरक्षितता हीच माझी प्रथम प्राथमिकता आहे. सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून नागरिकांना मेट्रोचा सुखद अनुभव घेता येईल,” असेही सरनाईक यांनी सांगितले.
या घोषणेमुळे मीरा-भाईंदरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच शहराला आधुनिक आणि गतिमान वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.