सिद्धिविनायक ट्रस्टचे उत्पन्न १८२ कोटींवर; ‘भाग्यलक्ष्मी’सह समाजोपयोगी योजनांना गती

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ट्रस्टचे उत्पन्न विक्रमी १८२ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून भाविकांचा वाढता सहभाग आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे ट्रस्ट प्रशासनाने स्पष्ट केले. शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा लाभलेले सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीत सन २०२५-२०२६ चे वार्षिक विवरणपत्र आणि सन २०२६-२०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सादर केले. अपेक्षित १५५ कोटींच्या तुलनेत उत्पन्न थेट १८२ कोटींच्या घरात पोहोचल्याने ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांची मुदत ठेव त्यांच्या मातांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, ट्रस्टच्या उत्पन्नातून विविध समाजोपयोगी योजनांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी ३६ कोटी रुपयांचे वैद्यकीय सहाय्य, शासकीय व निमशासकीय रुग्णालयांना २४ कोटी रुपयांची मदत, डायलेसिस केंद्रांसाठी २ कोटी ६० लाख, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तर ‘भाग्यलक्ष्मी’ योजनेसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजनेसाठी २ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
भाविकांच्या वाढत्या श्रद्धा आणि विश्वासातून सिद्धिविनायक ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना बळ मिळत असून आगामी काळात अधिक व्यापक लोककल्याणकारी योजना राबविण्याचा निर्धार विश्वस्त समितीने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *