मिरा रोड : मिरा रोड पूर्व येथील ‘तनिष्क स्पा’च्या आड देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आला. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत १४ तरुणींची सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा भाईंदर परिसरातील मिरा रोड पूर्व येथे ‘तनिष्क स्पा’ नावाने सुरू असलेल्या आस्थापनात मसाज सेंटरच्या आडून देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत अचानक छापा टाकला.
छाप्यात स्पामध्ये १४ तरुणी आढळून आल्या. यामध्ये थायलंडमधील तसेच भारतीय तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व तरुणींना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात स्पा चालविणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. आरोपींविरुद्ध मिरा रोड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत असून मिरा भाईंदर परिसरातील स्पा आणि मसाज सेंटरवर पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.