विरार(विनायक खर्डे) : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने राबविलेल्या ‘अभय योजना २०२५-२६’ ला नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करावरील दंड आणि शास्ती माफ करण्यासाठी ही योजना लागू केली होती. या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाधिक करदात्यांना लाभ मिळावा या उद्देशाने मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरल्यास दंड आणि शास्तीमध्ये नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये तसेच अधिकृत ऑनलाइन माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना ही शेवटची संधी मानून ३१ मार्चपूर्वी कर भरण्याचे आवाहन केले आहे. मुदत संपल्यानंतर थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या निर्णयामुळे वसई-विरार परिसरातील हजारो थकबाकीदारांना दिलासा मिळणार असून महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.