मानखुर्दमध्ये ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; १२०० झोपड्यांवर संयुक्त कारवाई

मुंबई : मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई करत तब्बल ११ एकर जमीन अतिक्रमणमुक्त केली. या मोहिमेत आतापर्यंत १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई अतिक्रमणमुक्त करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, अतिक्रमण निष्कासन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ४०० अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबविली.
कारवाईदरम्यान शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेल्या झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पार पडली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.
दरम्यान, मोकळ्या करण्यात आलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रशासनाच्या या निर्णायक कारवाईमुळे शासकीय जमिनींचे संरक्षण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून भविष्यातही अशा प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *