भुयारी गटारांसाठी खोदूनठेवलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात महाड करांचा प्रवास होणार चिखलातून! रस्ते पूर्ववत करण्यासाठी निधीची तरतूदच नाही !

महाड –(मिलिंद माने)
महाड शहरात सद्या भुयारी गटार, वीज केबल, आणि पाणीपुरवठा पाइपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यामध्ये माती, खड्डे, दगड साचून रस्त्यांची चाळण करण्याचे काम सुरु आहे. हे रस्ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी मात्र निधीची तरतूद नसल्याने ऐन पावसाळ्यात महाड करांचा प्रवास चिखलातून होणार आहे.

महाड शहरात सद्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांतून विविध कामे सुरु आहेत. महाड शहरात केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत कुंभ योजना राबवून एच.डी.पी.ई. पाईप वापरून पिण्याच्या पाण्याची कोट्यावधीची योजना राबवली जात आहे. तर राज्य शासन आणि नगर पालिकेच्या माध्यमातून भुयारी गटार काम केले जात आहे. महावितरणच्या माध्यमातून शहरात भुयारी केबल टाकली जात आहे. यासाठी देखील नगर पालिकेने परवानगी दिली असून यामध्ये कोणतीच आडकाठी आणू नये अशी जणू तंबीच जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाड शहरात अंतर्गत असणाऱ्या जवळपास ५३ किमी अंतरातील रस्त्यावर हे काम केले जाणार आहे. त्यापैकी १४ किमी अंतरात खोदकाम केले आहे. हि कामे करताना कोणत्याच प्रकारचे नियोजन न करता सरसकट खोदकाम सुरु करण्यात आले आहे.

रस्त्याच्या मधोमध भुयारी गटार साठी सुमारे पाच फुटाचा चर काढून त्यातून प्लास्टिकचा पाईप टाकला जात आहे. हे काम पूर्ण करताना कांही दिवसांनी याच ठिकाणी खोदकाम करून चेंबरचे काम केले जात आहे. हे काम पूर्ण होत नाही तोवर रस्त्याच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले जात आहे. त्यानंतर लगेचच महावितरणच्या वीज केबलसाठी खोदकाम केले जात आहे. एकाच रस्त्यावर तीन वेळा तीन ठिकाणी खोदकाम केले जात असल्याने रस्त्याची चाळण करण्याचे काम सुरु आहे.
शहरातील सर्वच सुस्थितील रस्ते जेसीबी यंत्रणेच्या साह्याने खोदून टाकल्याने महाड कर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

महाड शहारात सद्या कोटेश्वरी तळे ते उभा मारुती हा रस्ता आधीच नादुरुस्त झाला होता. मागील पावसाळा देखील या परिसरात खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य होते. पाईप लाईन आणि इतर कामांसाठी खोदकाम होणार असल्याने या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी देखील तीच स्थिती निर्माण होणार आहे. उभा मारुती ते पंचायत समिती, भिमारे मैदान समोरील एस. टी. आगार ते काकरतळे मोहल्ला मार्ग, दीपक सावंत यांच्या घरापासून हॉटेल वेलकम, हॉटेल वेलकम पासून स्मशानभूमी पर्यंत, प्रभात कॉलनी मधील सगळे मार्ग, अशा विविध ठिकाणी रस्त्यांमध्ये भुयारी गटारे आणि नळपाणी पुरवठा पाईप लाईन साठी खोदकाम सुरु आहे. ज्या ठिकाणी भुयारी गटारांची कामे झाली आहेत त्या ठिकाणीच सिमेंट टाकून केवळ खड्डा भरण्याचे काम सुरु आहे. तर कांही ठिकाणी फक्त माती सरकवून हात झटकण्याचे काम केले जात आहे.

भुयारी गटारे आणि इतर कामासाठी शहरातील सर्व रस्ते खोदकाम करून टाकले जात आहेत. या रस्त्यांना पूर्ववत आणण्यासाठी डांबरीकरण किंवा काँक्रीटकरण करणे आवश्यक आहे. ५३ किमी अंतरासाठी कोट्यावधीची आवश्यकता आहे मात्र रस्त्यातून खोदकाम करताना नवीन रस्ते बनवण्यासाठी निधीची तरतूदच अद्याप झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खोदकाम करून झाल्यानंतर नवीन रस्त्यांची तरतूद झाली नाही तर या पावसाळ्यात महाड कर नागरिकांचा प्रवास खड्डे आणि चिखलातून होणार आहे.

महाड शहरात सद्या भुयारी गटारे, पाणीपुरवठा पाईप लाईन, महावितरण केबल साठी खोदकाम केले जात आहे, केबल टाकून आणि भुयारी गटार काम झाल्यानंतर रस्ता पूर्वपदावर आणण्याचे काम ठेकेदाराचे आहे मात्र नवीन रस्त्याच्या कामासाठी अद्याप निधीची तरतूद नाही – धनंजय कोळेकर , मुख्याधिकारी महाड
महाड शहर हे पूर प्रवण क्षेत्रात मोडत असताना व दरवर्षी पुराच्या पाण्याखाली संपूर्ण शहर येत असताना वास्तविकता या ठिकाणी या पद्धतीची भुयारी गटार योजना संकल्पना आवश्यकच नव्हती मात्र केवळ शासनाचा पैसा ठेकेदारांच्या , अधिकाऱ्यांच्या व राज्यकर्त्यांच्या खिशात घालण्यासाठी या योजनेचा स्वीकार केला गेला का असा सवाल महाड मधील नागरिक विचारत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *