भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?

रोहित शर्माची अनुपस्थिती, शुबमन गिलची दुखापत यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार आहेत. भारतीय संघ मंगळवारी ऑप्टस स्टेडियमवर सराव सत्रात सहभागी झाले होते आणि आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटल्याप्रमाणे हा संघ केवळ एका फिरकी गोलंदाजासह पर्थमध्ये खेळण्यासाठी उतरेल असे म्हटले होते, आता तसंच चित्र दिसत आहे. रविचंद्रन अश्विन हा पर्थ कसोटीत एकमेव फिरकीपटू म्हणून उतरणार आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमची खेळपट्टी हिरवी असेल, अशी अपेक्षा आहे आणि वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांच्या संयोजनासह उतरण्याचा विचार करत आहे, नितीश कुमार रेड्डीच्या रूपात एक वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे जो पदार्पणासाठी सज्ज आहे आणि अश्विनच्या रूपात एक फिरकीपटू आहे. भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह ऑस्ट्रेलियाला गेला आहे. अश्विनशिवाय रवींद्र जडेजा आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर हे देखील संघात आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत अश्विनने निश्चितपणे भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवले पाहिजे, कारण तो संघाचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवी खेळाडूंनी खेळले पाहिजे. तसेच, ऑस्ट्रेलियन संघातील अनेक डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध अश्विन निश्चितपणे प्रभावी ठरेल.” इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय संघ पर्थ कसोटीत फक्त एका फिरकीपटूसह उतरणार आहे आणि तो म्हणजे अश्विन. ऑस्ट्रेलियन संघात उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि ॲलेक्स कॅरी असे तीन डावखुरे फलंदाज आहेत. अश्विनचा डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. गेल्या दौऱ्यातही स्टीव्ह स्मिथला त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं होतं. संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. नितीश कुमार रेड्डीला पर्थ कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह देखील संघाचा भाग असेल. रेड्डीला या कसोटीत संधी दिली पाहिजे, असे गांगुलीचे मत आहे. भारतीय दिग्गज खेळाडू म्हणाला, ‘पर्थ (ऑप्टस) आणि गाबा (ब्रिस्बेन) येथे दोन विशेष फिरकीपटू खेळवण्यात काही अर्थ नाही. या परिस्थितीत नितीश रेड्डीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. खालच्या फळीत तो चांगला फलंदाज आहे. त्यामुळे संघाचा समतोल सुधारेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *