मुंबई- सिद्धार्थ महाविद्यालय रीयुनियन क्लबच्या वतीने चर्चगेट येथील गरवारे क्लब येथे ‘सिद्धार्थ रत्न’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आमदार प्रवीण दरेकर यांना मुख्याध्यापक भंडारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सिद्धार्थ रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक विठ्ठल लोकरे, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश दरेकर, मनसेचे प्रमोद गांधी यांसह सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, हा कार्यक्रम होत असताना महाविद्यालयीन जीवनातील गतकालीन आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. मी कुठल्याही महाविद्यालयात ऍडमिशन घेऊन एखादा अधिकारी घडलो असतो. पण आज मी जो काही दिसतोय तो सिद्धार्थ कॉलेजमुळेच. या महाविद्यालयात वेगळ्या प्रकारची शिकवण मिळाली. आयुष्यात संकटावर मात करत धाडसाने पुढे जायचे ते संस्कार आणि विचार सिद्धार्थ महाविद्यालयाने आम्हाला दिले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले, आम्ही कधी ना उमेद झालो नाही. प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आलोय.
जुन्या आठवणींना उजाळा देत दरेकर पुढे म्हणाले की, मी मनसेत आमदार झालो त्यावेळी विधिमंडळाच्या सभागृहात वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर भाजपात गेल्यावर आपल्या कर्तृत्वाची पारख करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी माझ्यावर दिली. ज्या जागेवर शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासारखे नेते झाले त्या ठिकाणी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रभर माझी ओळख झाली. विधिमंडळाच्या सभागृहातही अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असायचे परंतु सिद्धार्थ महाविद्यालयाचा असल्यामुळे धाडसाने प्रत्येक विषयावर सरकारला धारेवर धरण्याचे काम मी केले. राज्यात सर्वाधिक फिरणारा विरोधी पक्षनेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करता आली त्याचे सारे श्रेय सिद्धार्थ महाविद्यालयाला जाते.
दरेकर पुढे म्हणाले की, स्वयं/समूह प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला घर देण्यासाठी काम करतोय. अनेक इमारती स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईत उभ्या राहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘मित्रा’च्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपये स्वयं पुनर्विकासाला मिळवून देऊ सांगितले. मुंबईतील मराठी माणूस, गिरणी कामगार आज कुटुंब मोठी झाल्यामुळे बाहेर जाताहेत. ज्या वेदना, व्यथा जो अनुभवतो त्यालाच दुःख समजू शकतात. त्यांच्या व्यथा, वेदना प्रामाणिकपणे दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या विश्वासाने तुम्ही आमचा सत्कार केलात त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मी ज्या गोष्टी हाती घेतो
त्या पूर्ण करूनच पुढे जातो