भाजपा कामगार आघाडी मुंबईत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; विलेपार्लेतील मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* विलेपार्ले आमदार पराग अळवणी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : भाजपा कामगार आघाडी, मुंबई यांच्या वतीने आयोजित कामगार मेळावा व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विलेपार्ले येथील विश्वकर्मा बाग सभागृहात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी तसेच भाजपा मुंबई सचिव आचार्य पवन त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची मुंबई उपाध्यक्ष, विश्वकर्मा बाग चे अध्यक्ष तसेच सुतार-कारपेंटर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कथ्रेचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले संजय पराडकर यांची मुंबई सचिव, तसेच फेरीवाल्यांच्या समस्यांसाठी कायम अग्रेसर असलेले प्रकाश वाकाणी यांची मुंबई उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बीमल बुटा, प्रवीण बोरानिया, निलेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा मुंबईच्या नव्या नियुक्तीनंतर कामगार आघाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मेळावा ठरला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
आमदार पराग अळवणी म्हणाले, “भाजपा कामगार आघाडी ही केवळ संघटना नसून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी एक मजबूत शक्ती आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्य अधिक बळकट करून कामगारांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात.”
आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, “भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते हे समाजाशी जोडलेले आहेत. कामगार आघाडीच्या माध्यमातून आपण कामगारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणे आवश्यक आहे.”
कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले, “मुंबईतील कामगार वर्गाच्या सशक्तीकरणासाठी भाजपा कामगार आघाडी कटिबद्ध आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण अधिक व्यापक स्तरावर कामगारांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करू.” कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *