महाड दि. १९ मार्च: बुद्ध काळात जनसामान्यांची भाषा असलेल्या मागधी भाषेनं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मानवी कल्याणाच्या विचारांचं पालन आणि रक्षण केल्यानं पा पालेति रक्खतीति पालि म्हणून ती जगभर प्रतिष्ठित झाली. आता बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानं प्रतिष्ठा मिळालेल्या समाजानं बौद्ध आयडेंटिटीच्या प्रतिष्ठापनेसाठी पालि भाषा अवगत करून तिच्या प्रचार प्रसारासाठी तन मन धनानं योगदान द्यावे, असे आवाहन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी क्रांतीभूमी, महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात केले.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची महाड तालुका शाखा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक(बार्टी) महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवशीय पालि भाषा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रा. आनंद देवडेकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे महाड तालुका शाखा अध्यक्ष रानकवी मारुती सकपाळ हे होते.
पालि भाषा प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीलाच पालि भाषेचे महत्त्व समजावून सांगताना पालि भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक आयु. राजेंद्र भालशंकर म्हणाले की, पालि भाषा ही आलोक म्हणजेच प्रकाश आहे. या प्रकाशात मानवी जीवनाशी निगडित सर्व प्रकारच्या चुकीच्या धारणा आणि गैसमजुती स्पष्टपणे लक्षात आलेली व्यक्ती सन्मार्गाची पथिक होते. पालि भाषेत चुकीचे शब्दोच्चार केल्यानं होणारी अर्थहानी विविध उदाहरणांनी स्पष्ट करून आयु. भालशंकर यांनी पालि भाषा प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालि भाषेच्या अभ्यासक रजनी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन सकपाळ यांनी केले. आयु. प्रकाश केशव कासे यांनी प्रशिक्षणार्थींसाठी भोजन व्यवस्था केली होती. प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र दिल्यानंतर अपरान्त महाड शाखेचे सचिव दीपक पाटील यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.