घाटकोपर पूर्वेत गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा

संस्कृती, परंपरा आणि उत्साहाचा देखणा संगम

घाटकोपर ता १९ , बातमीदार

गुढीपाडव्याच्या निमित्ताने घाटकोपर पूर्वेतील श्री दुर्गा परमेश्वरी मंडळाच्या वतीने भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा तसेच प्रभाग 131 च्या भाजपा नगरसेविका राखी जाधव यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी 9 वाजता पारंपरिक पद्धतीने शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. या यात्रेत महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आणि विविध परंपरांचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. वारकऱ्यांच्या हरिपाठाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते, तर चिमुकल्या मुलांनी लेझीमच्या ठेक्यावर सादर केलेल्या आकर्षक सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक सादरीकरणे आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. या प्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे , आमदार पराग शहा , आमदार मिहिर कोटेचा, प्रभाग समिती अध्यक्ष अश्विनी मते, नगरसेवक धर्मेश गिरी यांनी शोभायात्रेला भेट देत नागरिकांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर रितू तावडे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. शोभायात्रेच्या माध्यमातून घाटकोपर पूर्वेत गुढीपाडव्याचा सण पारंपरिक, सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *