काळे फासून व्यक्त केला संताप
भाईंदर : मिरा रोड परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने दुकानाची पाटी मराठीऐवजी गुजराती भाषेत लावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मनसे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पाटीवर काळे फासून निषेध व्यक्त केला.
मिरा रोड येथील अमर पॅलेस परिसरात अंड्यापासून बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दुकान चालवणाऱ्या विक्रेत्याने दुकानाचे नाव ‘सुरती घोटाळा’ असे ठेवून पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत लावल्याची बाब उघडकीस आली. याबाबत मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आला असून महापालिकेकडेही तक्रार केल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी शनिवारी संबंधित दुकानाच्या पाटीवर काळे फासून निषेध व्यक्त केला. तसेच पुढील काळात दुकानाचा नामफलक मराठी भाषेत लावावा, असा इशाराही दुकानदाराला देण्यात आला.
राज्यातील दुकानांच्या नामफलकांवर मराठी भाषा असणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. मराठीचा अवमान करणाऱ्या प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संदीप राणे यांनी दिला.
दरम्यान, मिरा-भाईंदर शहरात मराठी-अमराठी भाषेच्या मुद्द्यावर अधूनमधून वाद निर्माण होत असल्याने शहरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.