गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शन; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बोधचिन्ह अनावरण

मुंबई : मुंबईकरांना अस्सल कोकणी हापूसची चव चाखता यावी तसेच कोकणात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘युवा व्हिजन’ आणि ‘ब्रँडस मेकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी (८ एप्रिल) राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान गिरगाव चौपाटी येथील मॅकिचन ग्राउंड आणि हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबईकरांना थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस आंबे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जाणार असून मध्यस्थांची गरज कमी होणार आहे. बोधचिन्ह अनावरणानंतर बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “कोकणातील आंबा उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. तसेच ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनामुळे कोकणात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होणार आहे.” या महोत्सवात कोकणातील निवडक बागायतदारांकडून नैसर्गिकरीत्या पिकवलेले हापूस आंबे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कोकणातील सेकंड होम, गुंतवणूक आणि रिअल इस्टेटशी संबंधित विविध पर्यायांची माहिती ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. कोकणातील खाद्यसंस्कृती, स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक पदार्थांचाही आस्वाद मुंबईकरांना घेता येणार आहे. मुंबईकरांचा कोकणाशी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *