मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून कामगार व कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर देण्यांबाबत संवेदनशील असल्याचे प्रतिपादन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात २७ मार्च २०२६) संयुक्त सभा पार पडली.
या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान (ग्रॅच्युइटी), वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती, स्वमालकीच्या बसेसची उपलब्धता तसेच आर्थिक सहाय्य या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत महापौर रितू तावडे यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वासन दिले.
महापौर तावडे म्हणाल्या, ‘बेस्ट’ ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक वाहतूक आणि वीज पुरवठा करणारी महत्त्वाची संस्था आहे. देशातील मोठ्या नागरी परिवहन सेवांपैकी ‘बेस्ट’ एक महत्त्वाचा उपक्रम असून तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ‘बेस्ट’कडे स्वतःच्या मालकीच्या बसेसचा ताफा वाढविण्यास प्राधान्य दिले जाईल. यासाठी सातत्याने बैठका घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच बेस्ट प्रशासनाने आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यावर भर द्यावा. दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा बेस्ट महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. अश्विनी जोशी, सहायक महाव्यवस्थापक (विधी) राजेंद्र डुबल, मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) रमेश मडावी यांच्यासह बेस्टचे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमुळे बेस्ट उपक्रमातील प्रलंबित प्रश्नांवर मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.