पक्ष्यांना फरसाण अन् पाव खाऊ घालणार, तो जाळ्यात अडकणार !
परदेशी पाहुणा ‘सीगल’ भारतात दाखल झाला आहे. अमेरिका आणि युरोपातले सिगल पक्षी भिवंडी कल्याण सीमेवरील खाडीत, दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन सिगल पक्षी खाडीत येतात, खाडी पुलावर पक्षी बघणाऱ्यांची गर्दी जमते. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप या पक्ष्यांचं असतं. अमेरिका, युरोप येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी दरवर्षी हिवाळ्याच्यावेळी भारतात दाखल होतात. दोन महिने हे पक्षी इथेच मुक्काम करतात आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा ते माघारी परततात.
हिवाळ्याच्या काळात अनेक परदेशी पक्षी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले होते. पक्षी दिसले की अनेकांकडून पक्ष्यांना घरातील खाद्यपदार्थ खायला दिले जातात. प्रेक्षणीय स्थळे, उद्याने; तसेच पाणवठ्यांवर उतरलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांना अप्रमाणित खाद्य जसे पाव, चपाती, फरसाण, भात, शेव असे पदार्थ देणे नियमबाह्य आहे. पक्ष्यांना त्यांच्या शरीररचनेच्या विपरीत खाद्य घालून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यास दंड अथवा शिक्षा होऊ शकते.
मध्यंतरी मुंबईच्या किनाऱ्यावरील सीगल या पक्ष्याला चिप्ससह इतर खाद्य देण्यात आले होते तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदर शहराच्या हद्दीत गुजरातच्या दिशेला जाणार्या फाऊटंन हॉटेल समोरील उड्डाणपुलावर सीगल पक्षी आल्याने अनेक प्रवाश्यांनी देखील त्यांच्या कडील खाद्य पदार्थ खाऊ घातल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. या पक्ष्यांना भरवला जाणारा ‘जंक फूड’चा खाऊ त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करत पक्ष्यांना अशा प्रकारचा खाऊ घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारे पत्र पक्षीप्रेमींनी शासनाला दिले होते. केवळ याच पक्ष्यांसाठी नव्हे, तर इतर पक्ष्यांसाठीही हे खाद्य घातक ठरू शकते. जळगावातही तलाव, विहिरी आदी ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांना शेव, चिवडा, चिप्स खाऊ घालण्याचे प्रकार घडतात. अनेकजण चण्याच्या पिठापासून बनवलेल्या गाठिया, फरसाण, चिवडा, शेव आदी पदार्थ पक्ष्यांना देतात. मात्र, हे पदार्थ पक्षांच्या प्रकृतीसाठी घातक असल्याचा दावा पक्षीप्रेमी करतात.
पाव, शेव पक्ष्यांसाठी ठरतात हानिकारक
अनेकजण चण्याच्या पिठापासून बनवलेल्या गाठिया, फरसाण, चिवडा, शेव आदी पदार्थ पक्ष्यांना देतात. मात्र, हे पदार्थ पक्षांच्या प्रकृतीसाठी घातक असल्याचा दावा पक्षीप्रेमी करतात.