कोळशाची ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने ? आर. टी. ओ. आणि पोलिस प्रशासनाचा कानाडोळा

महाड – (मिलिंद माने) औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जात आहे. ज्या वाहनातून हा कोळसा आणला जातो त्या वाहनांच्या मूळ आकारात बदल करून वाहतूक केली जात असली तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या परिवहन आणि पोलिस प्रशासनाला ही धोकादायक वाहतूक दिसत का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे यापूर्वी अनेक अपघात होऊन देखील कारवाई होत नसल्याने या ओव्हरलोड वाहतुकीस पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकणात महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र अस्तित्वात आहे. कोकणातील या औद्योगिक क्षेत्रामध्ये बॉयलर साठी मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा लागतो. हा दगडी कोळसा बाहेरून मालगाडीने नागोठणे येथे येतो. त्यानंतर अवजड वाहनांमधून हा दगडी कोळसा महाड, खेड, चिपळूण या ठिकाणी पुरवठा केला जातो. या दगडी कोळशाच्या पुरवठ्यामध्ये बड्या लोकांचा हात असल्याने प्रमाणापेक्षा जास्त दगडी कोळसा वाहनांमध्ये भरून मुंबई गोवा महामार्गावर. सर्रासपणे वाहतूक केला जातो.
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चे नाव बदनाम करत आहेत महामार्ग वाहतूक पोलीस?

मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे, नागोठणे, महाड, पुढे कशेडी या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलिसांचे तपासणी नाके आहेत. या ठिकाणी अन्य वाहनांची तसेच छोट्या कार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोजक्याच बसेस, मोटर सायकल स्वार यांना थांबवून तपासणी केली जाते. यामध्ये प्रवाशांची तसेच वाहन चालकांची वेळ आणि पैसा देखील वाया जातो. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून कोकण दर्शनासाठी असंख्य पर्यटक कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये येत असतात हे पर्यटक खाजगी वाहनांना मधून प्रवास करत असताना नागोठणा सुकेळी खिंड, महाड जवळील . केभुर्ली, कशेडी घाटाजवळ या. पर्यटकांना . नाहक त्रास देण्याचे काम हे महामार्ग वाहतूक पोलीस सातत्याने करत आहेत यादरम्यान कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र रेड कार्पेट टाकला जातो. या अवजड वाहनांना का सूट दिली जाते असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

कोळसा वाहतूक करणाऱ्या या वाहनांना यापूर्वी देखील अपघात झाले आहे. या अपघातामध्ये अनेक जण मयत देखील झाले. मात्र तरीदेखील पोलीस आणि परिवहन (आर.टी.ओ.) विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. वाहनाची मालवाहतूक करण्याची क्षमता निर्धारित केलेली असताना त्याच्यावर बदल करून अधिक माल वाहून नेण्याचे काम हायवा मालकांकडून केले जात आहे. या अधिकतम मालामध्ये देखील मोठी कमाई या कोळसा वाहतूकदारांकडून आणि पुरवठा दराकडून केली जाते. मात्र महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत या वाहतूक ठेकेदार कोळसा पुरवठा आणि प्रशासनाला काहीही सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *