मुंबई – कोंडमळा दुर्घटना घडून जवळपास १५ दिवस उलटून गेले परंतु अद्यापही चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही. या पुलाच्या निधीसाठी कार्यादेश निघण्यास विलंब का झाला? या दिरंगाईसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार?, असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सार्व.बांधकाम मंत्र्यांना केला. यावेळी आ. दरेकरांच्या प्रश्नाला मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य सुनील शिंदे यांनी पुण्यातील कोंडमळा नदीवरील पूल कोसळल्याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले की, हा प्रश्न ग्रामविकास खात्याचा आहे किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचा हे महत्वाचे नाही तर सरकार म्हणून उत्तर देणे महत्वाचे असते. पुलाच्या निधीसाठी कार्यादेश निघायला विलंब का लागला? त्याची कारणे काय? त्याला जबाबदार कोण? अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण प्रश्न आणून चर्चा करतो. घटना घडून १५ दिवस झाले अजूनही चौकशी अहवाल आलेला नाही. कार्यादेश निघण्यासाठी विलंब का आणि दिरंगाई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार?, असा सवाल दरेकरांनी केला.
दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले की, विधानसभेची आचारसंहिता लागलेली त्याचबरोबर ग्रामस्थांनी फूटपथची मागणी केलेली, ते बजेटमध्ये बसत नसल्याने त्यात बदल करावा लागला. दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती आहे. जी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे तिचा अहवाल आला की जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदतही केली जाणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.