राज्यातील सहकारी संस्थांच्या चळवळीचा अभ्यास करून त्याला सरकारच्या माध्यमातून दिशा देण्याचा प्रयत्न करू, नाशिक येथील शिबिरात आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

 

नाशिक – पतसंस्थांच्या अनेक अडचणी आहेत. सहकारी संस्था चालवणे सोपे राहिलेले नाही. अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात राज्यातील सहकारी संस्थांच्या चळवळीचा अभ्यास करून त्याला दिशा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून करू, असे प्रतिपादन भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

या प्रसंगी नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, रायगड सहकारी संघाचे मानद सचिव रामदास मोरे, शिबिराचे आयोजक सुनील ढिकले, उपनिबंधक संदीप जाधव, सहकार प्रशिक्षक नितीन वाणी, साताऱ्याचे माजी जिल्हा उपनिबंधक जनार्दन शिंदे, रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, अकोला जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक आर. एस. बोडखे आदी मान्यवरांसह नाशिक जिल्हा-शहरातून मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, सहकारातील हे अत्यंत उत्तम शिबीर आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा मी अध्यक्ष झाल्यावर हा माझा पहिला कार्यक्रम आहे. सहकार हा माझा श्वास आहे. राज्य संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यावर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची पहिलीच संधी नाशिकच्या पवित्र भूमीत मिळत आहे. पतसंस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणी, कशा पद्धतीने संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांनी काम करावे आणि येणाऱ्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या पतसंस्था सक्षम कशा राहतील, अडचणी कशा येणार नाहीत याचे उदबोधन या निमित्ताने होणार असल्याचेही आ. दरेकर म्हणाले.

 

दरेकर पुढे म्हणाले कि, मी कल्पक कार्यकर्ता आहे. कुठल्याही ठिकाणी काम करत असताना वरवर काम कधीच करत नाही. रचनात्मक काम झाले पाहिजे, त्यातून काही निष्पन्न झाले पाहिजे ही भूमिका घेऊन काम करतोय. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून जवळपास मुंबईत २०-२२ इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही सहकाराची ताकद आहे. विकासक कमविणारा नफा एखादी सहकारातील जिल्हा बँक ठरवते, सरकारकडून राजाश्रय घेते व सर्वसामान्यांच्या आयुष्यात असलेले घराचे स्वप्न पूर्ण करते. तर एक पतसंस्थाही शेतकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यातही ‘अमूलाग्र क्रांती’ करू शकते. राज्यात अनेक पतसंस्था आहेत. काही बँकांची उलाढाल नाही एवढी पतसंस्थांची उलाढाल आहे. या पतसंस्था ताकदवान झाल्या पाहिजेत यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करू, असा विश्वासही दरेकरांनी दिला.

केंद्र सरकारने सहकाराला महत्व दिलेय. केंद्रात कधीच सहकार खाते नव्हते. कृषी क्षेत्रातील छोटासा भाग म्हणून सहकाराकडे पाहिले जायचे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने केंद्रात सहकार खात्याची निर्मिती झाली. ते खाते अमित शहा यांनी स्वतःकडे ठेवले. आज सहकार धोरण आलेय, देशात खऱ्या अर्थाने सहकाराला केंद्राच्या माध्यमातून कधी नव्हे एवढी मदत होताना दिसतेय. सहकाराच्या बाबतीत केंद्राचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. परंतु महाराष्ट्रात ज्या ताकदीने सहकाराकडे लक्ष देण्याची गरज होती ती दिली गेली नाही. नेता होण्यासाठी सहकाराची गरज लागते पण जेव्हा त्या संस्थांना ताकद देण्याची वेळ येते त्यावेळी कुठलाही पुढारी पुढे येत नसल्याचेही दरेकर यांनी म्हटले.

सहकारी संस्थांना ताकद दिली पाहिजे. त्या संस्था बळकट झाल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजेत व त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा शिखर संघ असणाऱ्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी निश्चित प्रयत्न करेन असा विश्वास देत दरेकर पुढे म्हणाले कि, ग्रामीण-शहरी भागातील सहकारी संस्था एकत्रित येऊन सहकाराची ‘वज्रमूठ‘ भक्कम करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या अडचणी काय आहेत, फेडरेशन, पतसंस्थांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन सर्वकष असा अहवाल दौरा करून राज्य सरकारला देऊ, असेही दरेकर यांनी आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *