मुंबई – पद कुठलेही असो त्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणे, पक्षाची वाढ झाली का? संघटनेत सर्वांना बरोबर घेऊन पक्ष बांधणी करतोय का? माजी पदाधिकारी असो,आपल्याला आवडो न आवडो शेवटी ते माझ्या कुटुंबातील आहेत, माझ्या पक्षाचे आहेत. आपल्यात मतभेद असू शकतात परंतु मनभेद असू नयेत. मागाठाणेत तशा प्रकारचे काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे, असा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मागाठाणे क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.
बुधवारी बोरिवली (पूर्व) येथील पाटीदार समाज हॉल येथे मागाठाणे उत्तर (वॉर्ड क्र. ३,४ व ५) व मध्य मंडळ (वॉर्ड क्र. ११ व १२) विधानसभा व वॉर्ड पदाधिकाऱ्यांच्या घोषणेचा कार्यक्रम भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाला भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मंडल अध्यक्षा सोनाली नखुले, मंडल अध्यक्ष अविनाश राय यांसह मोठ्या संख्येने माजी पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, दोन मंडलाचे प्रमुख कार्यकर्ते जे या सभागृहात उपस्थित आहेत कुठल्याही पक्षाकडे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची फौज भाजपा सोडून सक्रिय आहे असे वाटत नाही. सर्वांचे दिवे विझलेले आहेत. या देशाला, राज्याला व मुंबईला एकच आशेचा किरण हा भाजपा आहे. आपण ज्या पदांवर काम करणार आहोत तो आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे. केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. मुंबईतही सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांना काही देऊ शकलो नाही तर जनता माफ करणार नाही. त्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी रचनात्मक काम करण्याची गरज आहे. पद छोटे, मोठे आहे यापेक्षा मी त्या पदाला न्याय देतो का? हा विचार करून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही दरेकर यांनी दिला.
ते पुढे म्हणाले कि, मी स्वयंपुनर्विकास योजना आणली. आज २० इमारती उभ्या राहिल्या असून ५० इमारतीना कर्ज दिले आहे आणि १६०० प्रस्ताव जिल्हा बँकेकडे आले आहेत. चारकोपला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप झाले. माणूस अन माणूस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला. लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेत एक लाख मोफत खाती उघडली. त्याचा लाभ भाजपाला मिळणार कि नाही? तेवढ्यावरच मी थांबलो नाही तर या लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना आणली. माझ्या लाडक्या बहिणी सक्षम होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्यांचा हातभार लागला पाहिजे हा व्यापक विचार घेऊन काम करत असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करताहेत. पक्ष कार्यक्रम देतो तेव्हा मागाठाणेतील माझा कार्यकर्ता हा पुढे असतो. कटुता न येता हे कार्यकर्ते अभेद्यपणे पक्षाचे काम करताहेत याचा अभिमान असल्याचेही दरेकर म्हणाले.
माणूस कामाने मोठा होतो, पदाने नाही
दरेकर म्हणाले कि, माणूस कामाने मोठा होतो पदाने नाही. अनेक लोकं आहेत जी कधी आमदार, खासदार झाली नाहीत. पण त्यांचे आपण पुतळे बांधतो, हार घालतो. अण्णाभाऊ साठे आमदार, मंत्री होते का? परंतु त्यांचे नाव घेऊन अनेक जण आमदार, मंत्री होतात, कारण अण्णाभाऊ साठे यांनी काम केले. नवीन पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करावे. यातून स्पर्धा करावी, मात्र ती स्पर्धा एकमेकांची तंगडी ओढणारी नसावी, असा उपदेशवजा सल्लाही दरेकरांनी यावेळी दिला.
निवडणुकीत मराठीच्या मुद्यासह सर्व बाहेर काढणार
ठाकरे बंधुंवर शरसंधान साधत दरेकर म्हणाले कि, येणाऱ्या निवडणुकीत मराठीचा मुद्दा, भांडणे काय आहेत ते सर्व बाहेर काढणार आहे. निवडणुका ४-५ महिन्यांवर आल्या म्हणून मराठीचा पुळका आलाय. निवडणुकीत यांचे सोंग, ढोंग अक्षरशः उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. मला दोन्ही घरं नीट माहित आहेत. दारुगोळा भरून ठेवलाय, असा इशाराही दरेकरांनी दिला. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि खासदार पियुष गोयल यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेय कि मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडणार नाही. तरीही जशी पावसाळ्यात बेडकं बाहेर येतात तसे निवडणुका जवळ आल्या कि हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी आरोळी उठवतात. आपला राजकीय काळ उजाड झालाय म्हणून भावनिक विषय काढून काही करता येतेय का? असा शेवटचा प्रयत्न सुरु असल्याचा अप्रत्यक्ष टोलाही दरेकरांनी ठाकरे बंधुंना लगावला. तसेच कार्यकर्त्यांनी जागृत असले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
संघटन मजबूत करा
ते म्हणाले कि, संघटन मजबूत करा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. तुम्हाला पक्ष वाढीसाठी जे काही लागेल ते देणार. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहोत. येणाऱ्या काळात मागाठाणे विधानसभा किंवा मंडलं ही भाजपाची भक्कम बालेकिल्ला ठरतील असे काम करावे, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.