पाण्याच्या टँकर दरात दुपटीने वाढ; टँकर दरवाढीविरोधात शिवसेनेचा मोर्च्याचा इशारा

पाण्याच्या टँकर दरात दुपटीने वाढ; टँकर दरवाढीविरोधात शिवसेनेचा मोर्च्याचा इशारा

 

मिरा-भाईंदर (प्रमोद देठे )- मिरा-भाईंदर महानगरपालिकेने झोपडपट्टी आणि आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरच्या दरात अचानक ५०० रुपयांवरून ९५० रुपये इतकी वाढ केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या दरवाढीविरोधात शिवसेना उपजिल्हाप्रमुख राम भवन शर्मा यांनी आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन दरात त्वरित कपात करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसेना पक्षातर्फे मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मिरा भाईंदर महापालिका प्रभाग क्र.१४ अंतर्गत अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अद्याप पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काही ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी त्या पाण्यात माती मिसळलेली असून ते दूषित आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते, परंतु नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे टँकरसाठी वाढवलेले ९५० रुपये देणे शक्य नाही, असे रामभुवनशर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे. या दरवाढीमुळे प्रभाग क्र.१४ मधील झोपडपट्टी, आदिवासी आणि कातकरी समाजातील लोकांवर अन्याय होत असून, त्यांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठीही लाचार व्हावे लागत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

“दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत टँकर दर पुन्हा ५०० रुपये करावेत अन्यथा ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना मोर्चा काढणार असून, यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला महानगरपालिका जबाबदार असेल,” असा स्पष्ट इशारा राम भवन शर्मा यांनी दिला आहे.

महानगरपालिकेने अजूनही प्रभाग क्र.१४ मधील झोपडपट्टी व आदिवासी भागात पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सोय केली नसल्याने लोकांना वर्षानुवर्षे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अशातच दरवाढ हा अन्यायकारक निर्णय असल्याचे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *