भाईंदर: अवकाळी पावसामुळे शहरातील नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला असला, तरी वादळामुळे काही भागात तात्पुरते नुकसान झाले. मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी हा पाऊस एक इशारा ठरला असून, पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी वाढविण्यासाठी महापालिकेने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
भाईंदर (प.) येथील १८ वर्षे जुनी सीएनजी गॅसवर चालणारी स्मशानभूमीची चिमणी जोरदार वादळामुळे झुकली. सुदैवाने चिमणी कोसळली नाही, मात्र महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून ती काढून टाकली. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या कार्यवाहीत दुपारपर्यंत चिमणी पूर्णतः काढण्यात आली.
वादळामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काशिमीरा कॉम्प्लेक्समध्ये रस्त्याचे अपूर्ण काम असल्याने एक मालवाहू वाहन चिखलात अडकले. जेसीबीच्या साहाय्याने ते सुरक्षितरित्या काढण्यात आले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला असून, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी २४x७ कार्यरत विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर यांनी सांगितले की, ४० टक्के नाले स्वच्छ करण्यात आले असून, कोणत्याही आपत्कालीन घटनेसाठी नागरिकांनी तक्रार नोंदविण्यासाठी या कक्षाशी संपर्क साधावा.