भाईंदर – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ ड वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेश रमेश शिंदे यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘ही निवडणूक सत्तेसाठी नसून स्वाभिमान, अस्तित्व आणि न्यायासाठी आहे,’ असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
प्रभाग २३ हा केवळ भौगोलिक भाग नसून आगरी-कोळी, चर्मकार, सोलंकी, पारधी तसेच संपूर्ण बहुजन समाजाच्या संघर्षाचा इतिहास असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘येथील नागरिक श्रीमंत नसले तरी स्वाभिमानाने जगणारे आहेत. शिक्षण, सुरक्षितता, रोजगार आणि मूलभूत सुविधा ही येथील जनतेची प्रमुख अपेक्षा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत प्रभागाला खड्डे, कचरा, दूषित पाणी, बेरोजगारी आणि असुरक्षितता याशिवाय काहीच मिळाले नाही,’ असा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीपुरतेच नेते दिसतात, त्यानंतर जनता वाऱ्यावर सोडली जाते, अशी टीका करत शिंदे यांनी याला ‘लोकशाहीची फसवणूक’ असे संबोधले. आगरी-कोळी बांधवांचे हक्क, चर्मकार समाजाचे प्रश्न तसेच सोलंकी व पारधी समाजाच्या मूलभूत गरजा कायमच दुर्लक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वतःच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, खड्ड्यांविरोधात आंदोलने, महापुरुषांच्या सन्मानासाठी आवाज, तसेच वंचित, कष्टकरी, कामगार आणि फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. ‘मी मोठा नेता म्हणून नाही, तर तुमच्यातलाच एक म्हणून उभा आहे. दारू, पैसा किंवा खोटी आश्वासने देणार नाही; मात्र प्रामाणिक संघर्ष, निर्भय आवाज आणि निष्ठावान सेवा देईन,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘नगरसेवक राजा नसून जनतेचा सेवक असतो. मी निवडून आलो तर सत्ता जनतेची असेल. दलाली, टक्केवारी आणि लाचखोरीला माफी नसेल,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची आणि पुढील पिढीच्या भवितव्याची असल्याचे सांगत, मतदारांनी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन उमेश शिंदे यांनी केले आहे.