१५ जानेवारीला मतदान! मिरा-भाईंदरमध्ये SVEEP अभियानातून मतदार जागृतीला वेग

 

मीरा-भाईंदर | प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सन २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध घटकांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नवमतदार यांना मतदान प्रक्रियेची माहिती देऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून मनपा शाळा क्रमांक २२, भाईंदर (पश्चिम) येथे शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मतदानाचे महत्त्व, मतदार म्हणून असलेली जबाबदारी आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी पत्रलेखनाच्या माध्यमातून पालकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून घरोघरी मतदानाचा संदेश पोहोचविण्याचा हा प्रयत्न नागरिकांमध्ये विशेष आकर्षणाचा ठरला.

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, हा संदेश SVEEP अभियानाच्या माध्यमातून मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे सातत्याने दिला जात असून, आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *