अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य ! महाड खाडीपट्ट्यातील रस्ता वाहतुकीसाठी बंद महाड म्हाप्रळ रस्ता पूर्ण होण्यास अजून किती वर्ष लागणार ?

 

 

महाड – (मिलिंद माने)  महाड तालुक्यातील म्हाप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते महाप्रळ या मार्गावरील काम गेली पाच वर्षांपासून कासवगतीने सुरूच आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे यामुळे या परिसरातील नागरीक गेली पाच वर्षांपासून याच खराब रस्त्याचा त्रास सहन करत आहेत. . त्यातच महाड तालुक्यातील स व गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी टाकलेली माती अवकाळी पावसाने या मातीचे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी आज बंद झाला आहे यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे

 

महाड तालुक्यातून म्हाप्रळ पासून पंढरपूर पर्यंत जाणारा मार्ग आहे. हा मार्ग पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता. मात्र सध्या तो महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर यातील वरंधा घाट ते म्हाप्रळ दरम्यान असलेला सुमारे ८२ किमीचा मार्ग महाड तालुक्यातून जातो. या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण कामाची निविदा सन २०१८ रोजी सुमारे २८०.४२ कोटी रुपयांची काढण्यात आली. त्यानुसार हे काम एम बी पाटील या ठेकेदाराला देण्यात आले. मात्र पाटील कंपनीने हे काम न केल्याने शासनाने त्यांच्याकडून ठेका काढून घेतला आणि सन २०२१ मध्ये दुसरी निविदा काढली. सुमारे २०८.१० कोटी रुपयांची निविदा काढून हे काम अक्षय कंट्रक्शन आणि पी.डी.आय.पी.एल. कंपन्यांना देण्यात आले. असतानाच निविदा प्रक्रियेतील बदलामुळे प्रत्यक्ष कामाला सन २०२१ रोजी सुरवात झाली. तिथपासून आजतागायत या रस्त्याचे काम अद्याप सुरूच आहे.

सध्या महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास नऊ किमी दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. या टप्प्यामध्ये एक टक्का देखील काँक्रिटीकरण काम झालेले नाही. तुडील गावापासून पुढे साधारण दोन किमी अंतर पर्यंत अत्यंत खराब रस्त्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. पुढे रोहन गावापासून चिंभावे पर्यंत देखील रस्त्याचे काम कमी अधिक प्रमाणात झालेले आहे. वराठी गावापासून पुढे गोमंडीपर्यंत देखील खडी पसरून ठेवण्यात आलेली आहे. गोमेंडी गावापासून म्हाप्रळ पर्यंत एकेरी काँक्रीट काम झालेले आहे.

गिरगाव फाट्यापासून खाडीपत्त्याकडे जाणारा रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून चालू असले तरी सर्व गावाजवळ रस्त्यावर टाकलेल्या माती अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे या मातीचे रूपांतर चिखलात झाल्याने यातून चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर घसरत असल्याचे पाहण्यास मिळाले मात्र एवढा प्रकार घडून देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी मात्र वातानुकूलित कॅबिनमध्ये बसून पावसाचा आस्वाद घेत होते तर या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्याची काम करणारी यंत्रणा देखील गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संताप झाले आहेत या रस्त्यावरून चालणारी वाहने विशेषता मोटरसायकल व कार अनेक ठिकाणी. एक लाख रुतून बसल्याचे पाहण्यास मिळत होते स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनेकांना मदतीचा हात देण्याचे ग्रामस्थांनी प्रयत्न केला मात्र शासकीय यंत्रणा व ठेकेदार गायब असल्याने ग्रामस्थ व प्रवासी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अजब कारभाराविरोधात शिव्यांची लाखोली वाहताना पाहण्यास मिळाले

 

राजेवाडी गावापासून वरंधापर्यंत देखील अद्याप टप्प्या टप्प्यात काम सुरु आहे. तीन वर्षांपासून हे काम अशाच पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाचे अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अशा कामचुकार ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

२० किलोमीटर मध्ये डांबरीकरण

म्हाप्रळ पंढरपूर या मार्गामध्ये महाड औद्योगिक वसाहती मधून बाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या स्थलांतराकरता सुमारे १५० कोटी रुपये अपेक्षित असल्याने महामार्ग विभागाने जलवाहिनीचे स्थलांतर रद्द करून या वीस किलोमीटर अंतरामध्ये डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. काँक्रिटीकरणाचे काही टक्केच काम झालेले असताना डांबरीकरण काम मात्र अल्पावधीत पूर्ण झाले आहे. मात्र यात देखील वीस किमी पेक्षा कमी अंतरामध्ये डांबरीकरण झाल्याचे दिसून येत आहे.

आधुनिक यंत्रणा वापरून देखील महाड शिरगाव ते म्हाप्रळ या फक्त २४ किमी अंतराला पाच वर्ष लागली आहेत. अशाच पद्धतीत मुंबई गोवा महामार्ग, महाड रायगड मार्ग हे रस्ते देखील रखडले आहेत. या अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आलेल्या अभियंत्यांचा आणि एकाच वेळेस अनेक ठिकाणी काम घेणाऱ्या ठेकेदारांचा उपयोग काय असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

 

पहिल्याच अवकाळी पावसामध्ये महाड तालुक्यातल्या पूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे तर पावसाळी चार महिन्यात तालुक्यातली ग्रामीण भागातील या रस्त्यांची अवस्था काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी मात्र या निमित्ताने शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र गेंड्याच्या कातडीचे बनल्याचे अनेक प्रवाशांनी या ठिकाणी बोलून दाखवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *