मुंबई- कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. ज्यावेळी कोकण रेल्वे स्थापन झाली त्यावेळी ती सक्षम झाल्यावर भारतीय रेल्वेत विलिनीकरण केले जाईल असे ठरले होते. मात्र अद्याप तसे झाले नाही. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला असल्याची माहिती दिली.
लक्षवेधीवर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, कोकण रेल्वे महामंडळाकडे आर्थिक क्षमतेसह कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही. त्यामुळे कोकणात दुहेरी मार्ग होणे, स्थानके विकसित करणे, मूलभूत सुविधा देणे महामंडळाला शक्य होत नाही. ज्यावेळी कोकण रेल्वे महामंडळ स्थापन झाले त्यावेळी सक्षम झाल्यानंतर भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा असे ठरले होते. चाकरमान्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय असून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का? केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणार का? अशी विनंती कोकणवासियांच्या वतीने आ. दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, कोकण रेल्वे महामंडळ म्हणून निर्माण झाले. सातत्याने तोट्यात असल्या कारणाने या महामंडळाची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची क्षमता उरली नाही. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासह इतर गोष्टी करण्यासाठी जो काही निधी लागतो तो महामंडळाकडे उपलब्ध नाही. अनेक बैठका झाल्या त्यात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी महामंडळाचे रेल्वेत विलिनीकरण केले तर रेल्वे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकेल असा प्रस्ताव मांडला. केरळ, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांनी त्याला संमती दिलीय. आम्हीही त्याला संमती देऊ केवळ त्याचे नाव कोकण रेल्वे राहिले पाहिजे त्यालाही केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिलीय. सर्व गोष्टींचा विचार करता इतर तीन राज्यांसोबत महाराष्ट्रही यासंदर्भातील होकार केंद्र सरकारला कळवणार असल्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.