मुंबई – राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करीत आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. सदर बैठकीला भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर, आ. चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महामंडळाचे प्रतिनिधी, वित्त आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत. या निर्णयामुळे महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे.
तर भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील महिला-भगिनींच्या मागे भावाप्रमाणे ठामपणे उभे राहिल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार असल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.