मिरा भाईंदरच्या एकतेसाठी चला मराठी शिकवू या ” — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मिराभाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यात येणाऱ्या हिंदी-मराठी वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका घेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे. “मिरा-भाईंदरमध्ये कोणताही भाषावाद नको. आम्ही विकासासाठी आलो आहोत, फूट पाडण्यासाठी नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या पार्श्वभूमीवर, अमराठी नागरिकांनी सहजतेने मराठी शिकावी यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत बाराखडीची पुस्तके ठेवण्यात येणार असून, मराठी शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोणावरही जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिकवण्यात येईल.

 

“मी गेल्या चार टर्म मिरा-भाईंदरमधून मराठी आमदार म्हणून निवडून आलो आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक भाषेच्या नागरिकांनी मला मत दिले आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्व भाषांचा सन्मान महत्त्वाचा आहे. पण महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक आहेच. ती जबरदस्तीने नव्हे तर आत्मीयतेने शिकवायची आहे. त्याचसोबत मिरा-भाईंदर मध्ये शिवसेनेचे २२ नगरसेवक आहेत. त्यापैकी बहुतांश नगरसेवक हे अमराठी आहेत. तसेच मिरा-भाईंदर हे एक शांतताप्रिय शहर आहे. जिथे सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र राहतात. ह्याच मिरा-भाईंदरमध्ये मराठमोळे सण जसे कि मंगळागौर, गणेशोत्सव, दहीहंडी यांसारखे मराठमोळे सण हे अमराठी नागरिक तितक्याच आंनदाने साजरे करतात. त्यामुळे या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये.”, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

मिरा-भाईंदरमध्ये हिंदी व मराठी पदाधिकारी शिवसेनेत वर्षानुवर्षे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र काही राजकीय नेते या शांततेला तडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाषावाद पेटवून स्वार्थ साधण्यापेक्षा सर्व नागरिकांना बरोबर घेऊन विकास हाच आमचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“मिरा-भाईंदर हे शांततेचे शहर आहे. येथे कोणताही वाद नको. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून हा मराठी स्नेह उपक्रम सुरू करत आहोत. अमराठी बांधवांनी शिवसेना शाखेत येऊन प्रेमाने मराठी शिकावी. भाषेचा सेतू बांधूया, भिंती नाही!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *