मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे ते लोणावळा दरम्यानचा तिसरा व चौथा रेल्वे ट्रॅक प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर दिली.
मोहोळ यांनी सांगितले की, उपनगरी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या दोन ट्रॅकची गरज भासत होती. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देणार असून, त्यासोबतच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका देखील आर्थिक सहभाग नोंदवणार आहेत.
त्यांनी लिहिलं, “पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला आधीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता राज्य सरकारची मान्यता मिळाल्याने पुणे-लोणावळा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेसेवा वाढेल, गर्दी कमी होईल व विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार आणि व्यावसायिक वर्गापर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे”.
मोहोळ यांनी स्पष्ट केले की, अतिरिक्त ट्रॅक तयार झाल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढेल, मालगाड्यांचा अडथळा कमी होईल आणि औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला मोठा हातभार लागेल.