मिरा-भाईंदर महापालिकेतील महापौर वादावर जनतेत नाराजी; ‘आता एवढा गदारोळ का?’ असा सवाल

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांचे नाव सुचविल्यानंतर सामाजिक संघटना आणि एका राजकीय पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, महापौर मराठीच असावा या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून सुरू असलेल्या वादामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
यापूर्वीही मिरा-भाईंदर महापालिकेत इतर भाषिक महापौर झाले असताना असा गदारोळ झाला नव्हता. मग आताच एवढा वाद का निर्माण केला जात आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजपकडून मराठी भाषिक उपमहापौर देण्यात आला आहे, तसेच नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपचे ७८ नगरसेवक निवडून दिले आहेत त्यात ३५ नगरसेवक मराठी आहेत.अशा परिस्थितीत निवडणूक निकालानंतर महापौर पदावरून वाद उभा करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.मिरा भाईंदर मध्ये अंदाजे मराठी २३ %, मुस्लिम १४ %,
ईसाई ८ % , उत्तर भारतीय,मारवाडी, गुजराती जैन ५५ % टक्के मतदार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे त्यामुळे मिराभाईंदर मध्ये बहुभाषिक मतदार असल्यामुळे महापौर व उपमहापौर इतर भाषिक झाले तर आश्चर्य वाटू नये असे ही सांगण्यात येते.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर मराठी भाषिक महापौर अपेक्षित होता, तर महापालिका निवडणुकीदरम्यानच त्यासाठी ठोस प्रयत्न का झाले नाहीत? महापौर पदासाठी इच्छुक असलेली नावे सर्वांनाच माहीत असताना, सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकच मराठी उमेदवार का उभा केला नाही? तसेच मराठी मते विभागली जाऊ नयेत, यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याचाही आरोप केला जात आहे.
महायुतीतील विरोधकांनी यासाठी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये मोठ्या संख्येने मराठी नगरसेवक निवडून आलेले असताना, केवळ आंदोलनाच्या माध्यमातून विषय पेटवण्याऐवजी दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
“अगोदर मराठी मतदारांचा टक्का वाढवा, मराठी मतदारसंघ घडवा आणि मराठी तरुणांसाठी ठोस कामे करा. फक्त आंदोलन करून प्रश्न सुटत नाही,” अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिकांकडून उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *