मीरा-भाईंदर (प्रतिनिधी) : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक २३/ड मधील अधिकृत उमेदवार उमेश रमेश शिंदे यांनी कार्यकर्ते, समर्थक आणि मतदारांचे भावनिक शब्दांत आभार मानले आहेत. निवडणूक निकाल काहीही असो, मात्र या लढ्यात मिळालेला विश्वास आणि साथ हाच आपला खरा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, निवडणूक काळात नागरिकांनी त्यांना केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर आपला माणूस म्हणून साथ दिली. कुणी आर्थिक मदत केली, कुणी वेळ दिला, कुणी ऊन-थंडीची पर्वा न करता प्रचार केला, तर कुणी फक्त विश्वास दिला. “हाच विश्वास माझा खरा विजय आहे,” असे त्यांनी नमूद केले.
समोर आर्थिकदृष्ट्या बळकट आणि धनदांडगे उमेदवार असतानाही, आपल्याकडे पैसा किंवा सत्ता नव्हती, तर फक्त सामान्य माणसांचा पाठिंबा होता, असे शिंदे यांनी सांगितले. “ही निवडणूक मी एकट्याने नाही, तर सर्वांनी मिळून लढली आणि जिंकली आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निकाल काहीही असो, पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि स्वाभिमानाने काम केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन विश्वास दाखवणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि मीरा-भाईंदर शहराध्यक्ष इक्बाल महाडिक यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
“या लढ्यात खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता, समर्थक, मित्र आणि मतदारांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन,” असे सांगत उमेश शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.