मुंबई – वाडा तालुक्यात रबर टायरचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली उभ्या झालेल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. या कंपन्यातील प्रदूषित धुरामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. प्रदूषित धुरामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे लोकांना श्वसनाचा आणि त्वचा रोगाचा सामना करावा लागतोय. हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे पर्यावरण मंत्र्यांना उपस्थित केला.
सभागृहात लक्षवेधीवर बोलताना दरेकर म्हणाले की, रबर टायरच्या कंपन्यातील प्रदूषित धुरामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीची ऐशीतैशी वाडा तालुक्यात ६० कंपन्यानी केली आहे. याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आलेत. परदेशातून येणाऱ्या टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून पायरोऑइल कार्बन ब्लॅक तसेच स्टीलचे उत्पादन घेतले जाते. वाडा तालुक्यातील उसर, दिनकर पाडा, वडवली, बिलोशी, सापना, किरवली, कोणतोरणे या गावांत ६० हून अधिक हे कारखाने आहेत. हवेत मिसळणारे कार्बन फाईन रोखण्यासाठी आवश्यक स्क्रबर व प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा वापर बऱ्याचशा कारखान्यांकडून केला जात नाही. त्यामुळे लोकांना श्वसनाचा, त्वचा रोगाचा त्रास सहन करावा लागतोय. लोकवस्तीपासून हे कारखाने ५०० मीटर दूर असणे आवश्यक आहेत परंतु हे कारखाने लोकवस्तीच्या ३०० मीटरच्या आत आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी करून पालकमंत्र्यांनी आदेश देऊन अशा प्रकारच्या कंपन्यांवर कारवाई का झाली नाही? या कंपन्यातील प्रदूषित धुरामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झालेय त्यांना दिलासा देण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार? त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्या अहवालात रीहॅक्टरचा अपघात होऊन ३ कामगार व दोन मुले जखमी झाली. नंतर दोन स्त्री कामगार आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता. काळजी न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार? संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवाही दरेकरांनी उपस्थित केला.
दरेकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले की, येथे १० उद्योग सुरु होते त्यापैकी ८ उद्योग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते सद्यस्थितीत बंद आहेत. दोन उरलेल्या उद्योगांतील एका उद्योगात आग लागली. नुकसान झाल्याने तो बंद आहे. अजून एक उद्योग आहे त्याला निर्देश दिले आहेत. अधिक माहिती घेतली असता जे ९ बंद झालेले उद्योग अवैधरित्या चालू आहेत. असे असेल तर हा अपराध आहे. त्यांच्यावर कारवाई करु. ते चालू असल्याचे दाखवूनही जर तिथे कारवाई होत नसेल तर ते कारखाने आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. तसेच आगीप्रकरणी चौकशी करायला लावेन, अधिकची कारवाई करू असे आश्वस्त केले.