फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटाची क्लिप सभागृहात सादर भाजपा आ. प्रविण दरेकरांकडून एसआयटी चौकशीची मागणी

Spread the love

नागपूर- राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते होते आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांना अडकविण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून रचला गेला. पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेही ही ऑडिओ क्लिप भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात सादर केली. तसेच या प्रकरणाची तात्काळ एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणही दरेकर यांनी केली.

सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना दरेकर म्हणाले की, काल वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनेलवर एक अत्यंत गंभीर घटना राज्याच्या दृष्टीने दाखवली गेली. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते होते आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांना अडकविण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून रचला गेला. त्या संदर्भातील संभाषण, त्या ऑडिओ क्लिप पेन ड्राइव्ह मार्फत मी आणले आहे. संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्याने डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, अशा प्रकारच्या संभाषणाची क्लिप काल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली असल्याचे दरेकरांनी म्हटले. तसेच संजय पुनमिया यांनी शेखर जगताप, तेव्हाचे एसीपी सरदार पाटील आणि काही लोकं यांच्याविरोधात जेव्हा तक्रार दाखल केली त्यात जबाब जो दिलाय तो अत्यंत धक्कादायक असल्याचेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्लॅन करा आणि त्यांदृष्टीने कार्यवाही करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रस्थ वाढत होते. शिवसेनेत, महाराष्ट्रात त्यांच्याविषयी वेगळे वलय निर्माण झाले होते त्याविषयी भीतीही निर्माण झाली होती. बाळासाहेबांच्या विचारला मूठमाती दिलीय त्यामुळे त्यांच्या मनात वैचारिक बंडाची भावनाही होती, असेही दरेकर म्हणाले. यावेळी दरेकर यांनी फिर्यादी संजय पुनमिया यांचा ०२-०९-२०२४ रोजीचा जबाब सभागृहात वाचून दाखवला आणि एसीपी सरदार पाटील यांच्या ऑडिओ क्लिपही सभागृहात सादर केल्या.

दरेकर पुढे म्हणाले की, सुडाची भावना घेऊ नका बोलणारे कशा प्रकारे सुडाच्या भावनेने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने सरकारला धारेवर धरत होते, सगळ्या गोष्टी बाहेर काढत होते त्यांना अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची स्टिंग ऑपरेशनची कॅसेट, जबाबात आहे. सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही अडकविण्याचा प्रयत्न झालेला आहे. जस्टीस चांदीवाल यांनी डीसीपिंच्या संदर्भातही त्यांच्या कामात हस्तक्षेप करत होते ही तक्रारही केलेली आहे. त्यावेळचे वकील शेखर जगताप यांना शासनाने पॅनलवर दिलेले नसतानाही कोर्टात हजर होते. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून एसआयटी नेमावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांची विभागीय किंवा एसआयटीमार्फत चौकशी करावी. ऍड. जनरल शेखर जगताप हे नेमले नसताना कोर्टात हजर होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असून त्यांना शासकीय पॅनलवरून काढावे, अशा तीन मागण्या दरेकर यांनी सरकारकडे केल्या.

दरेकर यांच्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की, एक कनिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीने हे करू शकत नाही. यामागे कुणीतरी सूत्रधार आहे. याचे उगमस्थान शोधायला हवे. हे प्रकरण रफादफा करण्यासारखे नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत त्यांच्यावर पोलीस विभागाला हाताशी धरून त्यावेळी असा काही प्रयत्न झाला असेल तर या विषयी सरकार अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली जाईल. जे मुद्दे रेकॉर्डवर आलेत ते सर्व मुद्दे एसआयटी चौकशीत घेतले जातील. निपक्षपातीपणे सर्व गोष्टींचा समावेश एसआयटीत करून तातडीने एसआयटीचा अहवाल प्राप्त करुन त्यानुसार कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *