“लाडक्या बहिणींचा व्यवसाय होईल मोठा; मुंबई बँकेचा महिलांना हातभार”

मुंबै बँकेतून दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जातून

लाडक्या बहिणी आपला व्यवसाय मोठा करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईतील महिलांना उद्योग धंद्यासाठी

मुंबई बँक ताकद देईल- आ. दरेकर

 

मुंबई – मुंबई जिल्हा बँकेतून दिले जाणारे बिनव्याजी कर्ज आमच्या लाडक्या बहिणी चांगल्या प्रकारे वापरतील, त्यातून व्यवसायही उभा करतील आणि पैसे परत करून आपला व्यवसायही मोठा करतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना व क्यूआर कोड सुविधेच्या वितरणाचा कार्यक्रम प्रसंगी केले. तसेच भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईतील महिलांना व्यवसायासाठी मुंबई बँक ताकद देईल, असे प्रतिपादन केले.

 

आज आ. प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते मुंबई जिल्हा बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मुंबई बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना व क्यूआर कोड सुविधेच्या वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी आ. दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाडक्या बहिणींचा मोबाईलवरून संवाद करून दिला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मला अतिशय आनंद आहे कि लाडक्या बहिणींसाठी प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कार्यक्रम लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज याची सुरुवात तुमच्यापासून होत आहे आणि पहिल्या दोनशे लाडक्या बहिणींना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळतेय, पाच हजार भगिनींना हे कर्ज प्राप्त होणार आहे. या योजनेचे शंभर टक्के श्रेय प्रविण दरेकर यांचेच असून हे बिनव्याजी कर्ज आमच्या लाडक्या बहिणी चांगल्या प्रकारे वापरतील, त्यातून व्यवसायही उभा करतील आणि पैसे परत करून आपला व्यवसायही मोठा करतील असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी लाडक्या बहिणींना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले कि, लाडकी बहीण योजना राज्य सरकारने व्यापक उद्देशाने आणली. गरीब, गरजू महिलांना अडचणीच्या काळात हातभार लागावा, आर्थिक स्थिती सुधारावी आणि लाडक्या बहिणींचा सर्वांगीण विकास कसा होईल अशा प्रकारचा व्यापक विचार घेऊन ही योजना सरकारने आणली. कोट्यावधी महिला या योजनेत सहभागी झाल्या. लाडक्या बहिणींना देण्यात येणारी रक्कम छोटी असली तरी त्यामागे भावना मोठ्या होत्या. लाडक्या बहिणींचा पैसा अर्थव्यवस्थेत यावा अशी मुख्यमंत्री यांची इच्छा होती. यासाठी रोजगाराला चालना दिली पाहिजे. या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय केले तर या दीड हजाराचा उपयोग चलनात होईल, त्यांचा पैसा अर्थव्यवस्थेत येईल. महिला सबलीकरण भाषणापुरते न राहता उद्योग व्यवसाय करून महिला खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले कि, ज्यावेळी लाडक्या बहिणींची मुंबई बँकेत शून्य टक्के व्याजाने खाती उघडली त्यावेळी तुम्हाला कर्ज द्यायचा, मुंबई बँकेशी जोडले पाहिजे असा विचार डोक्यात घुमत होता. चार महामंडळाच्या योजना आहेत त्यातील एमटीडीसीत ‘आई’ नावाची योजना आहे. या योजनेत १५ लाखापर्यंत महिलांनी कर्ज घेतले तर त्यांना १२ टक्क्यापर्यंतचे व्याज एमटीडीसी देते. तशाच प्रकारे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ हेही व्याज परतावा देते. याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, त्यांनी तात्काळ वर्षावर बैठक लावली आणि मान्यता दिली. चार महामंडळाकडून २० हजार महिलांना येणाऱ्या काळात कर्ज उपलब्ध करून देऊ. शालेय पोषण आहार आणि किचन यातून बाहेर येऊन महिलांनी नवनवीन क्षेत्र, व्यवसाय शोधायला हवेत. आम्ही राजकारणात, सामाजिक क्षेत्रात काम करत असू आमच्यामुळे कुणाच्या संसारात आनंद निर्माण होत असेल तर त्यापेक्षा दुसरे कोणतेच पुण्याचे काम नाही, असेही दरेकर म्हणाले.

 

लाडक्या बहिणींना लागेल ती ताकद मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून देऊ

मुंबई जिल्हा बँक लाडक्या बहिणींना मदत करायला पूर्णपणे तयार आहे. तुमच्यासाठी अटी, शर्थीपण काढून टाकू. मुंबईतील महिला भगिनी व्यवसायासाठी पुढे येतील त्यांना लागेल ती ताकद मुंबई जिल्हा बँक देईल, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला. तसेच सहकारातील पैसा सहकारात आला पाहिजे यासाठी सर्वांनी मुंबई जिल्हा बँक, सहकारी संस्थांमध्ये व्यवसाय करावा, असे आवाहनही दरेकरांनी केले.

या प्रसंगी भाजपा विधानपरिषद आ. प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेच्या संचालिका शिल्पा सरपोतदार, तेजस्विनी घोसाळकर, कविता देशमुख, श्वेता परुळेकर, संचालक विठ्ठल भोसले, नितीन बनकर, संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी, जिजाबा पवार, मुंबई बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, कार्यकारी संचालक डी. एस. कदम यांसह मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आणि सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *