मुंबई – आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यावतीने ‘सहकारातून समृद्धीकडे’ या अंतर्गत हमखास पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयंपुनर्विकासासंबंधी इत्यंभूत माहिती ‘ऑन दि स्पॉट’ देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन शनिवार १२ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.
ठाण्यातील मो. ह. विद्यालयाच्या सभागृहात प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या सभासद, संचालक, पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे. या कार्यक्रमात भाजपा विधानपरिषद गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास समितीचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
स्वयंपुनर्विकास रहिवाशांसाठी वरदान ठरणार
ठाणे शहराचा वेगाने विकास होत आहे. जुन्या ठाण्यातील शेकडो इमारती ४० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. या इमारतींना पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे. मात्र, सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिक मर्यादा येत असल्यामुळे, पुनर्विकास नाईलाजाने बांधकाम व्यावसायिकांकडे सोपवावा लागतो. त्यात अनेकदा प्रकल्प रखडण्याबरोबरच अनंत अडचणी येतात. यासाठी स्वयंपुनर्विकास रहिवाशांसाठी वरदान ठरणार असल्याचे ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी म्हटले आहे.