मुंबई- राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी शासनाकडे केली. त्यांच्या या विनंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.
विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर यांनी एसटी अडचणीत आहे, पैसे नाही, अशा परिस्थितीत निर्णय घेणारे जे संबंधित प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्या प्रस्तावात बदल करून अनियमितता केलीय. त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. १७०० कोटींची वाढ करण्याची हिंमत केली असेल तर त्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शासनाने निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती शासनाला केली.