दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडीं सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा- परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडीं सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा- परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

दहिसर:(६ फेब्रुवारी) सध्या केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो, त्यामुळे टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील दोन्ही बाजूने मुंबई कडे जाताना ३ रांगा व येताना २ रांगा (लेन ) या अवजड वाहनांचा टोल घेण्यासाठी चालू ठेवावेत. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी,टोलचे ठेकेदार उपस्थित होते.
– मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे.तरी देखील दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील उभारलेल्या वेगवेगळ्या लेन मुळे वाहनांचा वेग मंदावतो, सहाजिकच त्यामुळे लांबलचक रांगा लागतात आणि सर्व सामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे दूर करण्यासाठी तातडीने टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील मुंबई कडे जाताना केवळ ३ व येताना २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा.जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दुर होऊन जलदगतीने वाहने चेक नाका परिसरातून निघून जातील, पर्यायाने वाहतूक कोंडी होणार नाही. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटर पर्यंत लावण्यात यावेत.जेणेकरुन वाहन धारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल.
याचवेळी मंत्री सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एस.के. स्टोन सिग्नल जवळील उड्डाणपूलाच्या बांधकामाची पाहणी केली. अंतिम टप्प्यात आलेल्या या उड्डाणपूलाचे लोकार्पण येत्या १६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *