मुंबई – महाराष्ट्र सहकारी संघाला १०६ वर्षाची परंपरा आहे. या संघाची स्थापना महात्मा गांधींनी केली. वसंतदादा पाटील ते गुलाबराव पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते संघाचे अध्यक्ष झाले. परंतु संघाची अवस्था अतिशय बिकट असून तोट्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढण्यास सांगितले. महाराष्ट्रातील वातावरण बदलले असून ही निवडणूक म्हणजे केवळ सोपस्कार राहिला आहे. ही निवडणूक राज्य संघ कोण जिंकणार? कोण अध्यक्ष होणार? यापेक्षा राज्यातील सहकाराला नवीन दिशा देणारी ठरणार आहे, असा विश्वास भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी कार्यकर्ता व मतदारांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार २७ जुलै रोजी पार पडणार आहे. २१ उमेदवार असलेल्या या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर, संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आधीच सहकार पॅनलचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कोहिनूर हॉल, दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राज्य संघाचे उमेदवार नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, संचालिका जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, मुंबई सह. बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, म्युनिसीपल को ऑप बँकेचे सर्वेसर्वा विष्णू घुमरे, आनंदराव गोळे यांसह मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, राज्य संघाची निवडणूक का लढवतोय? राज्य संघ काय आहे? उमेदवारी करताना आम्ही काय करणार आहोत? हे मतदार, सहकार चळवळीतील कार्यकर्त्याला माहित पाहिजे. हे होत नव्हते त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ अडचणीत आलीय. सहकार फक्त निवडणुकांपुरता पाहिला. शिक्षण-प्रशिक्षणाची, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जी आवश्यकता आहे ती राहिली नाही. कार्यकर्ता, जनतेचा दबाव राज्यकर्त्यावर नसतो त्यावेळेला जनता वाऱ्यावर पडत असते. राज्यातील सहकाराच्या बाबतीतही हेच झालेय. निवडणुकीला सहकार, सहकारी संस्था, कार्यकर्ते लागतात. पण ज्यावेळी सहकाराची बाजू घ्यायची असते त्यावेळी दुर्दैवाने सहकाराच्या जीवावर मोठे झालेले मंत्री, आमदार पुढे येत नाहीत हे विधिमंडळात पाहिलेय. परंतु मी सर्वांना एकत्रित घेऊन सहकारात काम करायला हवे ही जाणीव ठेवली. सहकारामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. सहकार चळवळीच्या सर्व अडचणीवर विधिमंडळाच्या सभागृहात ताकदीने बोलण्याची भूमिका घेतल्याचेही दरेकरांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकारासाठी चांगल्या गोष्टी करून घेऊ. उपमुख्यमंत्री अजीत पवार, एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत. केंद्रात कधीच सहकार खाते नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते निर्माण केले व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी सोपवली. आता ते खाते राहिले नाही तर देशात सहकाराला ताकद देण्याचे काम होतेय. केंद्राचे अधिकृत सहकार धोरण तयार होणार आहे. ज्यावेळी आपल्या संस्था भक्कम असतील तेव्हा सरकारला सांगू खासगी बँकांच्या तुलनेत आमच्या संस्था आहेत. या पद्धतीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात दुरुस्तीचे काम राज्य सहकारी संघ करू शकतो असे सांगत आपले प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या सर्व गोष्टी करून दाखवायची धमक नक्की आहे. येणाऱ्या काळात ती दिसून येईल असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.
अडचणीतील संघाला पुन्हा वैभवशाली दिवस आणणार
दरेकर म्हणाले की, राज्य संघाच्या माध्यमातून संघाला दिशा देणार आहोत. शिक्षण-प्रशिक्षण निधी पूर्ववत प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू. बदल करून खरे प्रशिक्षण द्यायचे आहे. अडचणीतील संघाला पुन्हा वैभवशाली दिवस आणण्याचे आम्ही ठरवले असून ते करून दाखवू. मुंबई बँकेला सतराशे कोटीवरून पंधरा हजार कोटींवर नेले. आमच्यावर टीका झाल्या पण डगमगलो नाही. कारण मुंबईतील संस्थांचा आमच्यावर विश्वास होता. रायगड बँक अडचणीत होती तिला बाहेर काढले. बंद पडलेल्या संस्था जगल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय.
मुंबईतून १०० टक्के मतदान कप बशीला झाले पाहिजे
दरेकर म्हणाले की, ही निवडणूक पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. परंतु संदेश देणारी आहे. १,१८८ मतदार आहेत. तिथं १०० टक्के मतदान झाले पाहिजे. जेव्हा निकाल लागेल तेव्हा मुंबईतून १०० टक्के मतदान कप बशीला झालेय हा संदेश राज्यात गेला पाहिजे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. आपण ताकदीने ही निवडणूक लढवायची आहे. सहकार कार्यकर्त्यांचा असला पाहिजे तो खासगी होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचे असल्याचेही दरेकर म्हणाले.
सहकार पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे
इतर संस्था मतदारसंघ
१) नंदकुमार काटकर
२) संजीव कुसाळकर,
३) सुनील पाटील (सांगली),
४) नितीन बनकर
५) रामदास मोरे
६) अर्जुनराव बोरुडे, इतर मागास प्रवर्ग
7) धनंजय शेडगे, कोल्हापूर विभाग
८) वसंत पाटील, लातूर विभाग
९) प्रकाश भिशीकर, नागपूर विभाग
१०) अशोक जगताप, विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी
११) संजय पाटील, नाशिक विभाग
१२) विलास महाजन, अमरावती विभाग