शिवराज्याभिषेक सोहळा दरम्यान एसटीची कौतुकास्पद कामगिरी शिवभक्तांकडून एस टी महामंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक

 

महाड (मिलिंद माने): किल्ले रायगडावर दिनांक ६ जून आणि ९ जून अशा दोन दिवशी तारीख आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. यादरम्यान वाहतूक विभाग आणि एसटी महामंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावेळी टाळता येणे शक्य झाले.

ऐतिहासिक किल्ले रायगड वर ६ जून रोजी . तारखे प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तर तिथीप्रमाणे ९ जून रोजी राज्याभिषेक साजरा झाला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले होते. दरवर्षी कोंझर ते किल्ले रायगड दरम्यान जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अरुंद रस्ता आणि दुतर्फा होणारी पार्किंग यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती. मात्र गेली दोन वर्षांपासून वाहतूक विभाग आणि एसटी महामंडळाने या ठिकाणी दमदार कामगिरी केली आहे.

किल्ले रायगडाजवळील कोंझर या ठिकाणी शिवभक्तांच्या गाड्या थांबवून त्याच ठिकाणी पार्किंग करून एसटीने किल्ले रायगड पर्यंत ये -जा करण्याची सुविधा उपलब्ध केली गेली. याचा परिणाम म्हणून . शिवराज्याभिषेक दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य झाले आहे. एसटीच्या सलग फेऱ्यांमुळे पर्यटक आणि शिवभक्तांना रायगड किल्ल्यावर व किल्ल्यावर परतीच्या प्रवासात ये जा करणे सुलभ झाले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा आणि एसटी महामंडळाने शिवभक्तांना किल्ले रायगड पर्यंत नेणे आणि तेथून पुन्हा वाहन तळाजवळ आणणे ही जबाबदारी मोठ्या कार्य कुशल त्याने सांभाळली. दिनांक ५ जून पासूनच एसटी महामंडळाने महाड आगाराच्या सर्व गाड्या वाहन तळाजवळ उभ्या केल्या. या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना वाहन तळामध्ये वाहन पार्क केल्यानंतर तेथून किल्ले रायगड पर्यंत नेण्यासाठी सलग फेऱ्यांचे आयोजन महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कोंझर आणि पाचाड हेलिपॅड याठिकाणाहून ही व्यवस्था करण्यात आली होती. ६ जून रोजी १५४६ फेऱ्यांमधून जवळपास ७३,४५५ प्रवाशांची तर ९ जून रोजी ५९५ फेऱ्यांमध्ये १७,८५० प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली. या नियोजनबद्ध सुविधामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

महाड एसटी आगाराच्या आणि माणगाव एसटी आगाराच्या चालकांनी उत्साह दाखवत शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपली सेवा बजावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक साजरा केला. यावर्षी एसटी महामंडळाचे रायगडा विभाग नियंत्रक दीपक घोडे, यंत्र अभियंता संदीप शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. पुजारी, . एस टी महामंडळाचे अमर कल्याणकर तसेच योगेश जैतपाल या कर्मचाऱ्यांनी देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या दोन दिवसात जातीने लक्ष घालून अथक प्रयत्न केले. महाड आगाराचे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव यांनी देखील आपल्या पूर्वीच्या अनुभवाचा या कामगिरीमध्ये सहभाग घेऊन प्रशासनाला मदत केली.
किल्ले रायगडावर यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दिवस-रात्र मेहनत घेऊन शिवभक्तांची सेवा केली. – रितेश फुलपगारे महाड एस टी आगार प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *