मुंबई, दि. १० जून: “दि सोशल सर्व्हिस लीग” या संस्थेची ११४ वर्षांची गौरवशाली वाटचाल अत्यंत अभिमानास्पद असून, प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे. अशा या संस्थेच्या ‘दामोदर हॉल अनेक्स’चे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे,” असे प्रतिपादन मुंबई उपनगरचे पालकमंत्री नामदार ॲड. आशिष शेलार यांनी आज केले. या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री आशिष शेलार यांच्या आगमनानंतर संस्थेचे संस्थापक नामदार म. जोशी यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते संस्थेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर हे होते. संस्थेचे विश्वस्त सिताराम गिरप यांनी लिहिलेले ‘स्वयं विकासाच्या वाटेवर’ हे प्रेरणादायी पुस्तक यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आले, जेणेकरून त्यांना भविष्यात स्वतःचा विकास साधण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
‘दि सोशल सर्व्हिस लीग’ ही संस्था गेल्या ११४ वर्षांपासून शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे, विशेषतः समाजातील दुर्बळ घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे तिचे कार्य प्रशंसनीय आहे. ‘दामोदर हॉल अनेक्स’च्या या नवीन विस्तारामुळे संस्थेच्या कार्याला आणखी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.