मुंबई – भायखळा येथे घडलेले हत्या प्रकरण ही गंभीर घटना असून या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. त्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य पंकज भुजबळ यांनी भायखळा येथील तालुका अध्यक्ष यांची निर्घृण हत्या झाल्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत सहभाग घेत दरेकर म्हणाले की, ज्याची हत्या झाली त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिपही व्हायरल झाली होती. भायखळा पोलीस ठाण्यात जाधव नावाचे पीआय व महिला अधिकारी आहे. त्यांच्याकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होतोय. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था महत्वाची आहे. जी मुंबई शांत आहे तिला पुन्हा गँगवॉर उभे करून अशांत करायचे आहे का? त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी केली.
दरेकर यांच्या मागणीवर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा चौकशी करू व चौकशीअंती काही निष्पन्न झाले तर निश्चित कारवाई करू, असे मोघम उत्तर दिले. यावर आक्षेप घेत दरेकर यांनी एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली. त्यावर मंत्री कदम यांनी एसआयटी नेमून कारवाई करू, असे आश्वासन दिले.