रायगडावर तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा! 

 

धनगर समाज आणि व्यावसायिकांना संरक्षण देण्याबाबत भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांचे परस्परविरोधी भाष्य

 

महाड -( मिलिंद माने)  शिवकालीन पांरपरिक वेशभूषेत रायगडावर आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या .उपस्थितीत आज किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आसमंतात दुमदुमला. तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने, .आरत्यांनी मंगलमय. वातावरणात झालेल्या रायगडावरील शिवरायांच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. वरुणराजाने देखील हजेरी लावून आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला.

शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे आज ३५२ वा . श्री शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. हजारो शिवप्रेमींनी मोठया उत्साहात या सोहळयाला हजेरी लावली होती. यावेळी उपमुख्य मंत्री नामदार एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम खासदार श्रीरंग बारणे , नामदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, खा. श्रीधर बारणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार रुपेश म्हात्रे, हिरोजी इंदलकर यांचे वंशज बांदल, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, कोकणकडा मित्र मंडळाचे सुरेश पवार. नितीन पावले माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे ,संजय कचरे, मनोज काळीज कर , पोलादपूरचे कापडे विभाग प्रमुख तानाजी निकम तालुकाप्रमुख निलेश अहिरे महाड तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे ,. महाडचे माझे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत इत्यादी उपस्थित होते.

 

रायगडाची गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नामदार गोगावले यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. राजसदरेवरील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली होती. रात्री शाहिरी पोवाडे, जगदंबेचा जागर व गोंधळाने रायगडावर रंगत आली. पहाटे साडेवाजता ध्वजारोहण सोहळा व श्री शिवप्रतिमापूजन करण्यात आले. गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी शिवरायांच्या मुर्तीची पालखी सदरेवर वाजत गाजत आणण्यात आली. या मिरवणूकीत महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली.गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने रायगडाच्या कडेकपारी रोमांचीत झाल्या होत्या. पावसाचा गारवा व दाट धुक्यातही शिवप्रेमींमधील अलोट उत्साह दिसत होता. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेदउच्चारासोबत सकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा व दुग्धाभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेकही करण्यात आला. हा क्षण सदर, होळीचा माळ, बाजारपेठ येथे उपस्थित असलल्या हजारो शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा होता. राज्याभिषेकानंतर हलगी, ढोलताशे, लेझीम, मुदमंगाच्या वाद्यात, शिवजयघोषात शिवप्रेमींच्या उत्साहात शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक राजसदरेहून होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशी नेण्यात आली. होळीच्या माळावर दांडपट्टे, लाठीकाठी, तलवारबाजी असा मर्दानी खेळा बरोबरच लेझीम सादरीकरणही दिमाखात करण्यात आले.

 

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडावर तिथीप्रमाणे झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी किल्ले रायगडाचे संवर्धन करण्याबरोबरच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल असे प्रतिपादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मराठी अस्मितेचा ओंकार असल्याचे सांगून या राज्याभिषेकाने भारतात एकमेव हिंदू राज्य निर्माण झाल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सर्व शास्त्रा आणि शस्त्रात पारंगत होते त्यामुळे ते एक सर्वसाधारण राजा नसून देवाचा अंश होते असे देखील सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडकिल्ल्यांच्या अतिक्रमण मुक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी गडांवरील अतिक्रमण मुक्त केली जातील असे स्पष्ट केले.

शेकडो वर्ष राहणाऱ्या धनगर समाजाला कोणी हरवू शकणार नाही – ना. भरत गोगावले

राज्याभिषेक सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष नामदार गोगावले यांनी यावेळी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता या सोहळ्याला देखील शिवभक्त मोठ्या प्रमाणे उपस्थित राहतात असे सांगून जिल्ह्यातील नेते मात्र सोहळ्याला हजेरी देखील लावत नाही असा अप्रत्यक्षरीत्या टोला .३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना लगावला. यावेळी गोगावले यांनी गडांवरील अतिक्रमण दूर केली जात असली तरी रायगडावरील धनगर समाज शेकडो वर्ष राहत असून त्यांना कोणीही हलवणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.

या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे स्वप्न असल्याने गडांवरील अतिक्रमण दूर केले जाईल असे सांगत असताना दुसरीकडे मात्र नामदार गोगावले यांनी परस्परविरोधी विधाने समोरील शिवभक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

रायगडावर तिथी प्रमाणे साजरा झालेला श्री शिवराज्याभिषेक सोहळा व तारखेप्रमाणे साजरा झालेला श्री शिवराज्याभिषेक सोहळा यामध्ये गर्दीचे तफावत मात्र आवर्जून जाणवत असल्याचे यावेळी जमलेल्या अनेक शिवभक्तांकडून ऐकण्यास मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *