उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. वंचितकडून निवडून आलेल्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
या भेटीदरम्यान कल्याण–डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
दरम्यान, उल्हासनगर शहराच्या विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. या घडामोडीमुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.