उमरखाडीतून प्रभाग २२३ मध्ये शिवसेना–भाजप महायुतीची भव्य बाईक रॅली; प्रिया रुपेश पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२३ मधून शिवसेना–भाजप महायुतीच्या उमेदवार सौ. प्रिया रुपेश पाटील यांच्या प्रचारार्थ उमरखाडीपासून संपूर्ण प्रभागात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहात पार पडली.

शिवसेना मुंबादेवी विभागप्रमुख रुपेश पाटील आणि उमेदवार सौ. प्रिया रुपेश पाटील यांनी गेल्या काळात केलेल्या सामाजिक मदत कार्यामुळे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी मतदारांनी पुष्पगुच्छ देऊन, हार घालून शुभेच्छा देत उमेदवारांचे स्वागत केले.

दरम्यान, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे.

या भेटीमुळे प्रचाराला नवे बळ मिळाले असून जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि परिवर्तनासाठी ही लढाई अधिक जोमाने लढण्याचा निर्धार करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारांनी दाखवलेला विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास सौ. प्रिया रुपेश पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *