मुंबई | प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता दीपक भास्कर खांबित यांच्यावर भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर, निधीची अफरातफर आणि जनतेची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी गटई कामगार प्रदेशाध्यक्ष प्रकाश नामदेव अहिरे यांनी ११ ऑगस्ट २०२५ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले असून, दोषी अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणात १४ ऑगस्ट २०२५ रोजी अहिरे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव मुळे आणि २८ ऑगस्ट रोजी प्रधान सचिव गोविंदराज यांची भेट घेतली. दोन्ही वेळेस अधिकाऱ्यांनी “महानगरपालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल” असे उत्तर दिले. मात्र अहिरे यांनी असा आरोप केला आहे की, अहवालाच्या नावाखाली कारवाई टाळली जात आहे, जेव्हा की त्यांच्याकडे ठोस दस्तऐवजी पुरावे उपलब्ध आहेत. प्रकाश अहिरे यांनी
भारतीय न्याय संहिता (BNS)
* कलम.१६६ सार्वजनिक सेवकाने कायद्याचे उल्लंघन करणे.
* कलम.१६८ पदाचा दुरुपयोग करून अनुचित लाभ मिळवणे.
* कलम.३१६ सार्वजनिक निधीचा अपहार करणे.
* कलम.३१८ बनावट दस्तऐवजांचा वापर करणे.
* कलम.३२४ फसवणूक करून मालमत्ता/पैसा मिळवणे.
* कलम.३६० भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्हे. तसेच
भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) आणि भारतीय न्यायिक प्रक्रिया संहिता (BNSS) यांच्या विविध कलमांचा उल्लेख करत शहर अभियंता दीपक खांबित यांच्यावर तत्काळ निलंबन, फौजदारी कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे.१) दीपक खांबित यांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करावे.
२) त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे.
३) मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे FIR नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात यावी.
४) या प्रकरणात सहभागी इतर अधिकारी आणि ठेकेदारांवरही तपास व कारवाई केली जावी अश्या मागण्या आहेत.
त्यांनी मा. प्रधान सचिव, नगरविकास विभाग,आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका,पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार,संचालक, ACB (भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग)
मा. लोकायुक्त,
CBI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
महालेखापाल, महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
“जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील, हा प्रश्न केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर संपूर्ण प्रशासकीय पारदर्शकतेचा आणि जनतेच्या पैशाच्या सुरक्षेचा आहे. ” असा ठाम पवित्रा प्रकाश अहिरे यांनी घेतला आहे.